नांदेड येथे रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारं
नांदेड (जिमाका) दि. 2 :- रस्ते अपघातात होणारी वाढ व यात होणारी जीवीतहानी दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. परिवहन विभागाने जे नियम दिले आहेत त्या नियमानुसार वाहनांची निगा व गतीबाबत दिलेल्या सुचनांचे काटेकोरपालन केले तर प्रत्येकाच्या जागरुकतेतून अपघातांची ही संख्या आपल्याला कमी करता येऊ शकेल. कायद्याच्या पालनासह वाहन चालवितांना योग्य ती दक्षता घेतली तर यात होणारे मृत्यूचे प्रमाण आपल्याला कमी करता येऊ शकेल, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर-जज यांनी केले.
रस्ता सुरक्षा अभियानाच्या आज आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या बोलत होत्या. हेलमेंट परिधान केलेल्या दुचाकीस्वार व सीटबेल्ट परिधान केलेल्या चारचाकी चालक व इतर प्रवाशी यांना गुलाबपुष्प देऊन त्यांच्या हस्ते आज प्रातिनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी यावेळी पोलीस विभागातर्फे रस्ता सुरक्षा अभियानाबाबत जनतेला आवाहन करून वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळण्याबाबत सांगितले. अशा उपक्रमातून लोकांनी लोकांचे प्रबोधन केल्यास सुरक्षिततेची भावना व काळजी मोठ्या प्रमाणात वाढीस लागेल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले.
आज सकाळी पोलीस अधीक्षक कार्यालय चौक येथे सकाळी राबविलेल्या या उपक्रमामुळे चालक व प्रवाशांमध्ये जागरुकता निर्माण झाली. हे अभियान उद्या 3 जानेवारी रोजी आयटीआय चौक, पोलीस अधीक्षक कार्यालय चौक, देगलूरनाका, कर्मवीर अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राबविले जाणार आहे. यावेळी सर्व वाहन चालकांना वाहतुक चिन्हे यांची माहितीपत्रके वाटप करण्यात येतील. त्यामुळे वाहनचालकांना भविष्यात वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी प्रोत्साहित होण्यास मदत होईल.
बुधवार 4 जानेवारी 2023 रोजी प्रबोधनात्मक उपक्रमात देगलूर नाका येथे सकाळी 9 वा. वाहतुक नियमांचे पालन न करणारे वाहन चालक हेल्मेट / सिटबेल्ट परिधान न केलेले वाहन चालक, ट्रिपल सीट वाहन चालविणारे वाहनचालक यांना रस्त्याच्या बाजुला थांबवून वाहतुक नियमांबाबत व होणाऱ्या अपघाताच्या तीव्रतेबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे.
गुरुवार 5 जानेवारी 2023 रोजी पथनाट्याचे आयोजन करण्यात येणार आहे. यात स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ येथे विद्यार्थी व फकीरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्यामार्फत पथनाट्याद्वारे गर्दीच्या ठिकाणी अपघाताबाबत प्रबोधन व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा उपक्रम सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरकारी आस्थापना, रेल्वेस्टेशन, बस स्टॅण्ड या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.
शुक्रवार 6 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9 वा. उजव्या बाजुने चालणे हा अभिनव उपक्रमात सर्व विभागप्रमुख, एनसीसी, स्काऊट गाईड, एनएससचे विद्यार्थी, मान्यवर यांच्याद्वारे उजव्या बाजुने चालणेबाबत शपथ घेतल्यानंतर शहरात दोन प्रतिनिधीक स्वरुपात रॅलीद्वारे संचलन करण्यात येईल. कार्यक्रमाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे होणार आहे. रस्ता सुरक्षा अभियान 2023 अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहभाग घेऊन रस्ता सुरक्षा, वाहतुकीचे ज्ञान व अपघातांबाबत करण्यात येणाऱ्या माहिती व मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000