“उजवीकडून चाला” हे अभियान
रस्ते अपघातात निष्पाप पादचाऱ्यांचे बळी रोखण्यास प्रभावी
– प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर

नांदेड, (जिमाका) दि. 6 :- रस्त्यावर होणाऱ्या अपघातात केवळ वाहन चालकांनाच दोष देवू चालणार नाही. इतर असंख्य घटक अपघाताला कारणीभूत असतात. रस्त्यावरील पादचाऱ्यांना होणारे अपघात हे वाहनचालक आणि पादचारी या दोघांनी काळजी घेतली तर कमी होऊ शकतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे. रस्त्याच्या उजव्या बाजुने चालल्यास समोरून येणाऱ्या वाहनाचा निश्चित अंदाज बांधून पादचाऱ्यांना आपली सुरक्षितता घेता येऊ शकते. यादृष्टिने वॉक ऑन राईट अर्थात “रस्त्याच्या उजव्या बाजुने चाला” ही मोहिम खूप महत्वाची असल्याचे प्रतिपादन प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी केले.

वॉक ऑन राईट अर्थात रस्त्याच्या उजव्या बाजुने चाला या अभिनव मोहिमेच्या शुभारंभानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात आयोजित केलेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर जज, प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत व मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.

वर्षांनुवर्षे आपल्यावर डाव्या बाजुने चालण्याचे संस्कार झाले आहेत. पूर्वीचा काळ वेगळा होता. आता वाहनांची वाढलेली प्रचंड संख्या, वाढलेले महानगरे, लोकसंख्या यांचा समन्वय साधत जर सेवासुविधांचा विचार केला तर रस्त्यावर चालतांना पदोपदी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. त्या-त्या शहरातील उपलब्ध असलेली वाहने नेमकी कोणत्या मार्गाने ये-जा करतात, किती व्यक्तींकडे गाडीबाबतचे आवश्यक कागदपत्रे, वाहन चालक परवाना नुतनीकरणासह उपलब्ध आहे याबाबतचा डाटा असणे आवश्यक आहे. यावरुन त्या-त्या मार्गावरील वाहतुक वर्दळीचा एक निश्चित अंदाज घेता येऊन त्याबाबत नियोजन करता येईल, असे प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी सांगितले. या डाटासाठी प्राथमिक पातळीवर प्रत्येक कार्यालयाने आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची अशी माहिती संकलित करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना रस्त्याच्या उजव्या बाजुने चालण्याबाबत शपथ दिली. कोणत्याही बदलाची सुरूवात ही आपण स्वत:पासून जर केली तर त्याचा व्यापक परिणाम आपल्याला दिसून येतो. यासाठी आपल्या वर्तणात बदल करून उजवीकडे चालण्याची सवय प्रत्येकांनी अंगी बिंबवण्याची अत्यावश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी यावेळी अभियानाला शुभेच्छा दिल्या. प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी आपल्या प्रास्ताविकात या अभियानाचा उद्देश स्पष्ट केला. तर आभार प्रदर्शन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले.

उजव्या बाजूने चालत रॅलीद्वारे
विद्यार्थ्यांनी दिला कृतीशील संदेश

या अभियानाच्या निमित्ताने आयोजित रॅलीस एनसीसी, स्काउट आणि इतर विद्यार्थी-विद्यार्थींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हाधिकारी कार्यालय येथून दोन मार्गावर जाणाऱ्या रॅलीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर जज व मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला रवाना केले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कलामंदीर, एसपी ऑफीस चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर विद्यार्थी व मान्यवर उजव्या बाजुने चालून या अभियानाची सुरूवात केली. याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय ते वजिराबाद पोलीस स्टेशन, महावीर चौक, वजिराबाद रोड, एसपी ऑफीस चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावरही विद्यार्थ्यांचा दुसरा गट उजव्या बाजुने चालून लोकांपर्यंत हा संदेश पोहचविला.

0000

 

 

By sd2022