नांदेड, दि.3: Ashok Chavan यांनी आपल्या खासदारकीच्या काळात नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी काय दिवे लावले, याची उजळणी करूनच भाजपचे लोकप्रिय खासदार Pratap Patil Chikhalikar यांच्याशी तुलना करावी, असा सल्ला भाजपाचे महानगराध्यक्ष प्रवीण साले यांनी दिला आहे.
अशोक चव्हाण यांना महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्रीपद मिळूनही राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत नांदेडचा विकास करता आला नाही. चांगले रस्ते फोडून खड्डे तयार करणे आणि पुन्हा त्यावर रस्ते करणे आणि त्याकरिता नांदेड शहरातील जनतेला कर्जाच्या खाईत लोटणे, यापलीकडे त्यांच्याकडे विकासाची कोणतीही संकल्पना नाही. अशोक चव्हाण यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत नांदेड विभागाच्या रेल्वेचे प्रश्न सोडविता आले नाहीत. अधिवेशन काळात लोकसभेच्या सभागृहात देखील त्यांची नगण्य उपस्थिती होती. खासदार चिखलीकर यांच्या तुलनेत त्यांनी लोकसभेत अत्यंत कमी प्रश्न उपस्थित केले.
अशोक चव्हाण यांच्या खासदारकीच्या काळात नांदेडहून एकही नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली नव्हती. परंतु खा. चिखलीकर यांच्या काळात मागील चार दशकांपासून प्रलंबित असलेल्या नांदेड-देगलूर-बिदर रेल्वे मार्गाला मंजुरी मिळून पिंकबुक मध्ये या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला. नांदेड-लोहा-लातूर रोड रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यास मंजुरी मिळाली. नांदेड विभागातील विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. मुदखेड ते परभणी रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण अंतिम टप्प्यात आहे. मागील चार वर्षात रेल्वेच्या उड्डाणपूल आणि भुयारी पुलाची सर्वाधिक कामे सुरु आहेत. अशोक चव्हाण यांच्या खासदारकीच्या काळात नांदेडहून पुणे व मुंबईसाठी एकही नवीन रेल्वे सुरू करता आली नाही. परंतु खा. चिखलीकर यांच्या प्रयत्नामुळे राज्यराणी एक्सप्रेसचा मनमाडऐवजी नांदेडहून मुंबईपर्यंत विस्तार केला. पुण्यासाठी दररोज आणि अतिरिक्त रेल्वे सुरू झाली. देशाच्या राजधानीसह इतर भागांमध्ये जाण्यासाठी देखील नव्या रेल्वे सुरू झाल्या.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाकडून सुरू असताना त्याचे श्रेय घेण्यासाठी देखील अशोक चव्हाण धडपडत आहेत. खा चिखलीकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेवर कोणाची सत्ता आहे, याचा भेदभाव न ठेवता केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना, अमृत-2 योजना, नगरोत्थान योजना, जल जीवन मिशन योजना, स्वच्छ भारत योजना यासह इतर अनेक महत्त्वाकांक्षी योजनांमधून महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायतींना भरभरून निधी मिळवून दिला. परंतु त्याचे श्रेय देखील घेण्याचा केविलवाणा प्रयत्न अशोक चव्हाण हे करीत आहेत.
अशोक चव्हाण यांना त्यांच्या खासदारकीच्या काळात जिल्ह्यात एका इंचाचाही राष्ट्रीय महामार्ग करता आला नाही. परंतु खा. चिखलीकर यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील चारही दिशेने राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणल्या गेले आहे. नागपूर ते रत्नागिरी हा शक्तिपीठ महामार्ग नांदेडहून जाणार आहे. नांदेड शहरात रस्त्यावर खड्डे व त्यावर पुन्हा रस्ते तयार करून धनलक्ष्मी लुटण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांमार्फत केलेले प्रयत्न शहरातील जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. अशोक चव्हाण हे बांधकाम मंत्री असताना त्यांच्या विभागाने काही इमारत व पुलांच्या उभारणीसाठी लागणाऱ्या किमतीच्या दुप्पट किमतीत दुरुस्तीची कामे मंजूर करून ठेकेदारांना निविदा लाटून दिल्या. याची काही उदाहरणे नांदेड जिल्ह्यात देखील आहेत, असा दाखला साले यांनी दिला.
मराठवाड्यात मेट्रो पाहिजे, मराठवाड्यात वंदे भारत रेल्वे पाहिजे, अशी अपेक्षा करणाऱ्या अशोक चव्हाण यांनी त्यांच्या काळात अशा रेल्वे सुरू करता का आल्या नाही, याचे उत्तर अगोदर दिले पाहिजे. ज्या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. त्याची मागणी करून श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करणे अशोक चव्हाण यांनी बंद करावे. खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नामुळे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर मराठवाड्यात नांदेडहून मुंबईला पहिली वंदे भारत रेल्वे धावणार आहे. त्यामुळे अशा रेल्वेची मागणी करून अशोक चव्हाण यांनी स्वतःचे हसे करून घेऊ नये, असा सल्ला Praveen Saley यांनी दिला आहे.
चव्हाण-चिखलीकर यांच्यातील फरक
सामान्य जनतेला अशोक चव्हाण यांच्याकडे जाण्यासाठी संकोच वाटतो. परंतु, असा संकोच खासदार चिखलीकर यांना भेटण्यासाठी जनतेला कधीच वाटलेला नाही. चिखलीकर हे थेट जनतेला भेटतात. त्यांची कामे करतात. परंतु, अशोक चव्हाण यांच्याकडे जाण्यासाठी त्यांच्या डाव्या-उजव्याची परवानगी लागते, अशी कोपरखळीदेखील प्रवीण साले यांनी लगावली.